Skip to main content

नीतिमान युवकांना स्वामींचे स्फूर्तिदायी , दुमदुमणाऱ्या शब्दांत आवाहन-



      " हे नरनारींनो , तुमच्यामधे जर अशी पवित्र , अनाघ्रात पुष्पे असतील तर ती भगवंताच्या पादपद्मी वाहणे उचित होईल . जर तुमच्यामधे अशा व्यक्ती असतील की ज्यांची संसारात प्रवेश करण्याची इच्छा नाही , ज्यांचे वय फार झालेले नाही तर त्या त्याग करोत. आध्यात्मिकतेच्या प्राप्तीचे हेच रहस्य आहे - त्याग करा . भय कसले ? साहस अवलंबून त्याग करा बघू . असला प्रबल त्याग आवश्यक आहे .
      " तुम्हाला दिसत नाही काय की पाश्चिमात्य देशांत जडवादाचा कोण प्रबल स्रोत वाहतो आहे ? काम आणि अपवित्रता समाजाची हाडेदेखील पोखरीत आहेत , हे तुम्हाला दिसत नाही काय ? ह्या प्रकाराला तुम्ही केवळ शब्दांच्या द्वारा अथवा समाजसुधारणेच्या द्वारा कदापि पायबंद घालू शकणार नाही . सभोवार चाललेल्या क्षय - विनाशामधे धर्माच्या भरभक्कम अचल पायावर उभे राहून त्यागाच्या शक्तीनेच ह्या प्रकारास आळा घालणे शक्य आहे . वायफळ तोंडपाटीलकीत काय हशील ? आपल्या रोमारोमातून पवित्रतेची शक्ती , ब्रह्मचर्याची शक्ती त्यागाची शक्ती प्रकट होऊ द्या . जे रात्रंदिवस कांचनासाठी धडपडत असतात . त्यांच्यावर ही शक्ती जाऊन आघात करो . कांचनत्यागी अशा तुम्हाला कांचनासक्तीच्या विरुद्ध मार्गाने जाताना बघून ते आश्चर्यचकित होवोत आणि कामाचाही त्याग करा. असे काम - कांचन त्यागी बना , स्वतःचे जणू बलिदान करा.    
  " आणि हे कुणाकडूनही होऊ शकेल ? जे जीर्ण , शीर्ण , वृद्ध झाले आहेत , समाजाला ज्यांचा उपयोग नाही , अशांकडून नव्हे , तर नव्या दमाचे उत्तमोत्तम बलवान , युवकच हे करू शकतील . त्यांनाच भगवंताच्या वेदीवर आत्मसमर्पण करावे लागेल . आणि अशा स्वार्थत्यागाच्या द्वाराच जगाचा उद्धार होईल . जीवनाच्या समस्त आशा आकांक्षांना तिलांजली देऊन ते समग्र मानवजातीचे सेवक बनोत - समग्र मानवजातीत धर्माचा प्रसार करोत यालाच तर त्याग म्हणतात - केवळ बडबडण्याने हे व्हावयाचे नाही . उठा आणि कामाला लागा .
        " कुणावरही दोषारोप करू नका , कारण सर्वच पंथ , सर्वच मते चांगली आहेत . आपल्या स्वत:च्या जीवनाद्वारे दाखवून द्या की , धर्म म्हणजे केवळ शब्द , नाव वा संप्रदाय नव्हे , तर धर्म म्हणजे आध्यात्मिक अनुभूती. ज्यांना धर्माचा अनुभव आला आहे त्यांनाच धर्म कळेल , तेच  धर्म नीट समजू शकतील . ज्यांना

स्वतःला धर्मलाभ झाला आहे , केवळ तेच इतरांमधे धर्मभाव संचारित करू शकतील . तेच मानवजातीचे श्रेष्ठ आचार्य होऊ शकतील . केवळ तेच जगामधे ज्ञानाच्या शक्तीचा संचार करू शकतील .
      " एखाद्या देशात अशा व्यक्तींचा जितका उदय होईल तितका तो  देश अधिक उन्नत होईल . आणि ज्या हतभाग्य देशात अशा लोकांचा संपूर्ण अभाव असेल त्या देशाचे पतन अनिवार्यच होय . कशानेच त्या दुर्दैवी देशाचा उद्धार होण्याची आशा नाही . अतएव मानवजातीला माझ्या गुरुदेवांचा संदेश हाच आहे की -
 ' प्रथम स्वतः धार्मिक व्हा व सत्याची उपलब्धी करून घ्या . '
      “ तुम्ही केवळ तोंडाने ' मी आपल्या बांधवांवर प्रेम करतो ' असे घोकत न बसता आपले शब्द खरे करून दाखवण्यासाठी प्रत्यक्ष कामाला लागा . नि:संकोचपणे , निःसंदेहपणे झेप घ्या , स्वत : त्यागी बनून जगाचा उद्धार करा . "

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध

                                                                           भगवान बुद्ध ( अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील डेट्रॉइट नामक शहरी एकदा व्याख्यान देताना स्वामी विवेकानंदांनी भगवान बुद्धदेवांसंबंधी पुढील विचार प्रकट केले होते )      प्रत्येक धर्माने एकेका विशिष्ट साधनावर भर देऊन त्याचाच विशेष विकास केला असल्याचे आपल्याला आढळून येईल . बौद्ध धर्मामधे निष्काम कर्माला प्राधान्य मिळाले आहे . तुम्ही लोक बौद्धधर्म आणि ब्राह्मणीधर्म यात घोटाळा करून नका . या तुमच्या देशात अनेक व्यक्ती असला घोटाळा करताना आढळतात . ह्या लोकांची अशी समजूत आहे की , बौद्धधर्माचा सनातनधर्माशी काहीही संबंध नसून तो एक संपूर्ण स्वतंत्र धर्म आहे . परंतु ही त्यांची गैरसमजूत आहे , वस्तुस्थिती अशी नाही . वस्तुत : बौद्धधर्म हा सनातन धर्माचाच केवळ एक विशिष्ट संप्रदाय आहे . हा बौद्धधर्म गौतम नामक एका महापुरु...